दोन वर्षांपूर्वी 2 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या एफ १६ विमानांला मोठ्या बहादुरीनं पाडलं होत. परंतु, याच प्रयत्नात त्यांचं विमान पाकिस्तानात जाऊन कोसळलं होतं. यानंतर पाकिस्ताननं १ मार्च रोजी भारताकडे सुपूर्द केलं होतं. याच घटनेला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. याच दरम्यान पाकिस्तानकडून शनिवारी विंग कमांडर अभिनंदन यांचा एक नवा व्हिडिओ जाहीर करण्यात आलाय.
विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा ते पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात होते. पाकिस्तानी सेनेसमोर ते आपला अनुभव व्यक्त करत होते. परंतु, या व्हिडिओत अनेकदा छेडछाड केल्याचं स्पष्टपणे दिसतंय. प्रोपोगंडा फैलावण्याच्या उद्देशानं पाकिस्तानकडून हा व्हिडिओ जाहीर करण्यात आल्याचं म्हटलं जातंय.
या व्हिडिओत विंग कमांडर अभिनंदन दोन्ही देशांच्या समानता व्यक्त करताना दिसत आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असलेले अभिनंदन सावध दिसत आहेत परंतु, कोणत्याही प्रकारची भीती त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत नाही. एका बहादूर जवानासारखं ते समोर उभ्या ठाकलेल्या परिस्थितीला मोठ्या धैर्यानं सामोरे जात असलेले दिसत आहेत. पाकिस्तानच्या कैदेत असतानाही आणि दबावाखाली असतानाही स्पष्ट शब्दांत ते आपलं म्हणणं मांडत असताना या व्हिडिओत दिसत आहेत.