दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन व इंधन दरवाढीवरुन देशभरात राजकारण तापलं असतानाच आता याची झळ बॉलिवूडपर्यंतही पोहोचली आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले यांनी आता थेट बीग बी अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. दोघांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅस दरांमध्ये प्रचंड मोठी वाढ केली आहे. आज पेट्रोल १०० रुपये लिटर तर घरगुती गॅस सिलेंडर ८०० रुपये एवढा महाग झाला असून सामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले आहे. मोदी सरकारविरोधात लोक संताप व्यक्त करत आहेत. केंद्रात काँग्रेस प्रणित युपीए सरकार असताना पेट्रोलच्या दरवाढीविरोधात अमिताभ बच्चन, अक्षयकुमारसह अनेक सेलिब्रिटींनी ट्विट करून सरकारवर टीका केली होती.
मात्र आज युपीए सरकारवेळी असलेल्या दरापेक्षा मोठी दरवाढ झाली असतानाही हे सेलिब्रिटी मूग गिळून गप्प बसले आहेत. भाजपाच्या इशाऱ्यावर टिव टिव करणाऱ्या अमिताभ बच्चन, अक्षयकुमार यांचे चित्रपटांचे शूटींग व चित्रपट महाराष्ट्रात बंद पाडू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
काँग्रेस प्रणित युपीएचे सरकार हे लोकशाही मार्गाने चालणारे, संविधानावर चालणारे सरकार होते. त्यामुळेच अमिताभ बच्चन, अक्षयकुमारसह असंख्य सेलिब्रिटी सरकार विरोधातही आवाज उठवत होते. आज या मंडळींनी मोदी सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवणे अपेक्षित असताना ते भाजपाच्या हातचे बाहुले बनले आहेत. महागाई, शेतकऱ्यांवरील अत्याचाराविरोधात आता सेलिब्रिटी बोलत नाहीत म्हणूनच काँग्रेसने या भाजपाच्या पोपटांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे, असे प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.