मुंबई : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस तीन कोटी लोकांना देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने राज्यभर कोल्ड चेन उभी करण्याचे काम पूर्ण झाले असून केंद्र सरकारकडून त्यासाठीचे एसएमएस टप्प्याटप्प्याने येतील. त्यानुसार संबंधितांना लस देण्याचे काम पूर्ण होईल. ही माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लोकमत’शी बोलताना दिली.
केंद्र सरकारने यासाठी कोवीन नावाचे एक ॲप तयार केले आहे. सर्व राज्यांकडून त्यासाठीची माहिती मागवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस तसेच कोरोनाच्या लढ्यात सहभागी असणारे सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस आणि ५० पेक्षा जास्त वय असणारे सर्व नागरिक, यांना ही लस दिली जाणार आहे. त्यासाठीची सगळी माहिती गोळा करून
संबंधित अँपवर अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले आहे, असे सांगून टोपे म्हणाले, येऊ घातलेले व्हॅक्सिन कशा पद्धतीने द्यायचे, त्याची सुसज्ज तयारी झाली आहे. मतदान केंद्र उभारून जसे मतदान केले जाते, त्या पद्धतीने बूथ तयार करून व्हॅक्सिनेशन केले जाईल. त्यासाठीचे ट्रेनिंग सुरू आहे. कोल्ड चेनची व्यवस्था पूर्ण झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना ची लस सरसकट प्रत्येकाला दिली जाणार का? असे विचारल्यावर टोपे म्हणाले, ज्यांना प्राधान्याने लस देण्याची गरज आहे, अशांना लस आधी देण्यात येईल.
त्यासाठीची सगळी माहिती केंद्र सरकारने तयार केलेले ॲप वर नोंदवावी लागते. ती नोंद झाल्यानंतर संबंधितांना कोणत्या भागात, कोणत्या ठिकाणी लस दिली जाईल याचे मेसेज येतील. ते मेसेज आणि शासनाने मान्य केलेल्या ओळख पत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवल्यानंतर त्यांना लस मिळेल. कोणीही दबावतंत्राचा वापर करून लस मिळावी यासाठी प्रयत्न करू नये, त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात शासकीय रुग्णालयांमधून रक्त मोफत दिले जात आहे. रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून केलेल्या आवाहनाला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातल्या ५०० ब्लड बँक रक्त संकलनाचे काम करण्यासाठी व्यस्त झाल्या आहेत. इतका उत्तम प्रतिसाद जनतेकडून मिळत आहे, असेही टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले